स्मारकाबाबत देशाने विचार केला पाहिजे; शिवाजी पार्कवर लता दीदींच्या स्मारकाबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया!

मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं ब्रीच कँडी रूग्णालयात ९२ वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर मुंबई येथील शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशातील दिग्गजांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचं स्मारक करावं अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. पत्रात म्हटलं आहे की, ज्या ठिकाणी लता दीदी पंचतत्वात विलीन झाल्या त्याठिकाणी त्याचं स्मारक तयार करण्यात यावं. जनतेची ही मागणी लवकर पूर्ण करून ते एक प्रेरणास्थळ म्हणून घोषित करण्यात यावं.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राम कदम यांच्या मागणीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. लता दीदींना आपल्या सर्वांना कधीही विसरता येणार नाही. मात्र काहींनी शिवाजी पार्क येथे स्मारक बनवण्याची मागणी केली आहे. त्याची काही गरज नाही. त्यावर राजकारण कुणीही करू नये. स्मारकाबाबत देशाने विचार केला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे मंत्री, खासदार, आमदारांसह सिनेसृष्टीतील कलाकार खेळाडू, तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.