पवार साहेब शेतकऱ्याचे 2 एकरातील कलिंगड सरकारने लाईट कट केल्यामुळे पाण्यावाचून जळाले त्याचं काय करायचं ?

मुंबई –   महाविकास आघाडीच्या युवा आमदारांनी काल सकाळी शरद पवार यांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी  सुमारे 2 तास शरद पवार यांनी या आमदारांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.पाच राज्यांच्या निवडणूक निकालांबाबत आमदारांनीही आपल्या मनातील प्रश्न शरद पवार यांच्यासमोर ठेवले. बैठक आटोपल्यानंतर आमदार निघून जात असताना शरद पवार उभे राहिले, दोन्ही हात धरून मुठ घट्ट धरली आणि म्हणाले की घाबरण्याची गरज नाही, आम्ही राज्यात भाजपची सत्ता येऊ देणार नाही.

भाजप त्यांचा राजकीय प्रतिस्पर्धी असेल, पण त्यांच्या अनेक नेत्यांकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, हे मतही शरद पवार यांनी या तरुण आमदारांसमोर व्यक्त केले आहे. विशेषत: 24 तास काम करण्याची तयारी, योजनांचे मार्केटिंग आणि निवडणुकीची रणनीती असे अनेक गुण भाजप नेत्यांकडून शिकायला हवेत. यासोबतच शरद पवार यांनी तरुण आमदारांना सहकार क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रात उतरण्याचा मंत्रही दिला.

दरम्यान, यानंतर आता भाजप नेत्यांकडून देखील पवारांना लक्ष्य केले जाऊ लागले आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी एक ट्वीट करत शेतकऱ्यांची व्यथा मांडत पवारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, पवार साहेब म्हणत आहेत,घाबरू नका मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही. साहेब ते नंतर बघू पण माझ्या मतदारसंघातील फोंडशिरस (मारकडवाडी) येथील महेश नावडकर या शेतकऱ्याचे 2 एकर कलिंगड तुमच्या सरकारने लाईट कट केल्यामुळे पाण्यावाचून जळाले त्याच काय करायचं ? असा मार्मिक सवाल सातपुते यांनी उपस्थित केला आहे.