‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात; जाणून घ्या कशी आहे तिची तब्येत

The Kerala Story : सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. काही लोक या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत आहेत. मात्र निर्मात्यांनी खूप संशोधन करून सिनेमा बनवला आहे.

दरम्यान मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन (Sudipto Sen) हे रविवारी तेलंगणामधल्या करीमनगर याठिकाणी हिंदू एकता यात्रेत सहभागी होण्यासाठी जाणार होते. मात्र रस्त्यात चित्रपटाच्या टीमचा अपघात झाल्याची माहिती समोर आली. या अपघातात टीममधील काही सदस्य जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर आता अदा शर्माने ट्विट करत याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. संपूर्ण टीम सुखरूप असून काळजी करण्याचं काही कारण नाही असं तिने म्हटलंय.

रविवारी 8 वाजताच्या सुमारास तिने ट्विट करत माहिती दिली आहे. ‘मी ठीक आहे. आमच्या अपघाताविषयीचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने मला असंख्य मेसेज येत आहेत. संपूर्ण टीम ठीक आहे, आम्ही सगळे सुखरूप आहोत. कोणतीही गंभीर बाब नाही, चिंता करावी अशी कोणतीही मोठी गोष्ट नाही पण तुम्ही दाखवलेल्या काळजीबद्दल खूप खूप आभार,’ असं तिने स्पष्ट केलंय.

https://twitter.com/adah_sharma/status/1657757721335336961?s=20