कायद्यानेच या यंत्रणांना अधिकार दिलेले आहेत,फक्त त्याचा गैरवापर होऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे – पवार 

मुंबई –  शिवसेना नेते अनिल परब (Shiv Sena leader Anil Parab) यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली गेली आहे.

ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील (Marine Drive) सरकारी निवासस्थानी दाखल झाले होते. ईडीच्या या कारवाईमुळं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ईडीने अनिल परब यांच्यासंबंधित कोणत्या सात ठिकाणांवर धाड टाकली आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले,  केंद्रीय यंत्रणा त्यांच्या अधिकारांचा वापर करत कारवाया करत असतात. माझ्याही नातेवाईकांवर मागच्या काळात धाडी टाकल्या होत्या. मंत्री अनिल परब यांच्यावर आज कारवाई सुरु असल्याची माहिती काही लोकांनी दिली. मागे तर काही नेत्यांनी अमक्याचा नंबर, तमक्यावर कारवाई असे सुतोवाच केले होते आणि त्यानंतर त्या – त्या व्यक्तींवर कारवाई झालेली आहे.

अशा यंत्रणेमध्ये कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे कारवाई केली गेली तर कुणाचाही विरोध नाही. जसे राज्यसरकारच्या अखत्यारीत सीआयडी, ईओडब्ल्यू, लाचलुचपत विभाग आहे. त्यांना माहिती मिळाल्यानंतर ते कारवाई करतात. तसेच केंद्रीय यंत्रणा देखील काम करतात. कायद्यानेच या यंत्रणांना अधिकार दिलेले आहेत. फक्त त्याचा गैरवापर होऊ नये एवढीच माफक अपेक्षा सर्वांची आहे असेही अजित पवार म्हणाले.