मोदीसरकारने विकासाकडे दुर्लक्ष करुन फक्त राजकारणावर लक्ष केंद्रीत केले आहे; राष्ट्रवादीचा आरोप 

मुंबई  – डॉलरची किंमत ८० रुपये झाली… बेरोजगारी… महागाईने कळस गाठलेला आहे आणि जीडीपी सुधारायचे नाव घेत नाही. अशा या गंभीर परिस्थितीत मोदी सरकारने (Modi Government)विकासाकडे दुर्लक्ष करुन फक्त राजकारणावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. हे काय चालू आहे मोदी सरकारमध्ये? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

येणाऱ्या काळात डॉलरची किंमत १०० रुपये होणार का? आपलीही परिस्थिती श्रीलंकेसारखी होणार का? बेरोजगारी, महागाई आटोक्यात येणार का? हे स्वाभाविक प्रश्न आज देशातील जनता विचारात आहे. परंतु, यातील कोणत्याही प्रश्नाचे मोदीसरकारकडे उत्तर नाही. कारण त्यांचा सर्व वेळ फक्त विरोधी पक्षात फूट पाडण्यात आणि त्यांचे सरकार पाडण्यात वाया जात आहे असा थेट आरोपही महेश तपासे (Mahesh Tapase)यांनी केला आहे.

लोकसभेत काल केंद्रसरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांत चार लाख भारतीयांनी देशाचे नागरिकत्व सोडले… देश सोडला. जर खरंच या देशात अच्छे दिन आले आहेत, तर देशातील इतके नागरिक देश का सोडत आहेत? याचे आत्मपरीक्षण मोदीसरकारने करायला हवे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.