भाजपच्या काळातील नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभारामुळेच पुण्याची दुर्दशा?

पुणे – राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि या परतीच्या पावसाचा फटका पुणे शहरालादेखील (Pune City) बसला. पुण्यात सोमवारी पावसाने अक्षरश: हैदोस घातला (Pune Rain) होता. ठिकठिकाणी पावसामुळे पाणी साचले होते. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे गाड्या वाहून गेल्या.

सोमवारी रात्री नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. बिबवेवाडी परिसरात तर ढगफुटीसारखा पाऊस झाला. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, निसर्गाच्या कोपानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होऊ लगले आहेत. पुण्यात पाणी तुंबल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी याचे खापर भाजपवर फोडायला सुरुवात केली आहे. भाजपच्या काळातील नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभारामुळेच पुण्याची दुर्दशा झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पुण्यात वारंवार निर्माण होणाऱ्या पूरजन्यस्थितीची चौकशी होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या पूरस्थितीसंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. पुणे शहरातील रस्ते देखील दुरुस्त केले जाणार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.