संभाजी भिडे यांना अटक झाली पाहिजे, त्याशिवाय ते सरळ होणार नाहीत – भुजबळ 

Mumbai – शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे (Sambhaji Bhide )यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या गटाने देखील भिडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

दरम्यान, यावर आता अजित पवार गटाचे  मंत्री छगन भुजबळ यांनी भिडे यांच्यावर टीका केली आहे. संभाजी भिडेंवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना अटक झाली पाहिजे, त्याशिवाय हे सरळ होणार नाहीत. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही आहे की बहुजन समाजाचेच काही लोक मनोहर भिडेच्या मागे संभाजी भिडे असं करत फिरत आहेत.छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हे दुर्दैवी आहे. राज्यात आणि देशात अशा प्रकारे वातावरण गढूळ करणारं हे जे प्रकरण आहे हे थांबलं पाहिजे आणि कुणीही त्यांना पाठिशी घालता कामा नये. असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

मला एक कळत नाही त्यांचा बोलविता धनी कोण आहे? इतिहास बदलता येतो का? तुम्ही जे बोलताय ते रुजवता येतंय का असा एकंदरीत प्रयत्न सुरु असलेला दिसतो आहे. महात्मा फुले परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर आम्ही संभाजी भिडेंच निषेध करतो आहोत असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.