नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार – जयंत पाटील

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्प, कळमुस्ते,चिमणपाडा,अंबड,कापवाडी,आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजना लवकर मंजूर होण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेवून या कामांना तात्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांना बैठकीत दिली.

मंत्रालयातील दालनात नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध प्रकल्प मंजुरीची बैठक पार पडली या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील बोलत होते.यावेळी अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत,लाभक्षेत्र विकास सचिव किरण कुलकर्णी,सहसचिव अतुल कपोते, अहमदनगरचे अधिक्षक अभियंता अरूण नाईक,कार्यकारी अभियंता संगीता जगताप यावेळी या बैठकीला उपस्थित होत्या.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, उर्ध्व गोदावरी प्रकल्प प्रस्ताव,कळमुस्ते, चिमणपाडा,अंबड,कापवाडी,आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजनांच्या कामांच्या बाबतीत राज्य तांत्रिक सल्लागार समिती,नियोजन विभाग अशा वेगवेगळया पातळीवर प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यामध्ये असणा-या त्रुटी दूर करून ही कामे मंजूर करण्यासाठी जलसंपदा विभागा कडून एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्या त्या यंत्रणांकडून ही कामे मंजूर होण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.जेणेकरून नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागातंर्गत असलेले प्रकल्प मार्गी लागतील असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.