माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करावी; सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचा खुप मोठा वाटा आहे.

मुंबई : ७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचा खुप मोठा वाटा आहे. त्यांच्याप्रती समाजामध्ये खुप आदर व आपुलकी आहे. माता रमाई यांची ७ फेब्रुवारी रोजी जयंती असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हा दिवस अतिशय उत्साहात साजरा करुन माता रमाई यांचे स्मरण करतात असेही निवेदनात म्हटले आहे.

समाधानाची, सहकार्याची आणि सहिष्णुतेच्या मूर्ती असलेल्या माता रमाई यांनी समाजासाठी केलेला त्याग हा मोठा असून तो सर्वसामान्य जनतेपर्यंत व नवीन पिढीला मार्गदर्शक ठरण्याकरिता प्रबोधन, लोकशिक्षणाच्या हेतूने यावर्षीची त्यांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी करण्याकरिता राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी विनंती करतानाच संपूर्ण वर्षभरात महामानवांना अभिवादन करण्यासाठी प्रकाशित केल्या जाणाऱ्या यादीमध्ये त्यागमूर्ती माता रमाई याची जयंती दरवर्षी साजरी करण्याबाबत कायमस्वरूपी समावेश करण्यात यावा अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली आहे.