काँग्रेसच्या ‘या’ मातब्बर नेत्याने केली राजकारणातून निवृत्तीची घोषणा, सोनिया गांधींना पत्र लिहून म्हणाले…

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए.के.अँटनी यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार केला असून आता ते कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. ए के अँटनी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आता सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यायची आहे, असे म्हटले आहे.

ए के अँटोनी हे सध्या केरळचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत आहे. ए के अँटोनी 1970 मध्ये केरळमध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि 52 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत.

गेल्या वर्षी केरळ विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान अँटनी म्हणाले होते की, त्यांना आता निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घ्यायचा आहे. 81 वर्षीय एके अँटनी म्हणाले की, सक्रिय राजकारण सोडण्याबाबत मी सोनियाजींना कळवले आहे. मी काही महिन्यांपूर्वीच सोनिया गांधींना याबाबत अनौपचारिकपणे कळवले होते.

निवृत्तीच्या निर्णयासोबतच एके अँटनी यांनी असेही म्हटले आहे की, ते आता दिल्लीत राहणार नाहीत आणि निवृत्तीनंतर तिरुअनंतपुरमला शिफ्ट होतील. ते म्हणाले, ‘मी पीसीसी अध्यक्ष आणि इतर सहकाऱ्यांनाही कळवले आहे. पक्षाने मला अनेक संधी दिल्या आणि मी काँग्रेसचा सदैव ऋणी राहीन. आता मला दिल्ली सोडून एप्रिलमध्ये तिरुअनंतपुरमला जायचे आहे.