‘महाकाल लोक’ लोकार्पणानिमित्त भाजपातर्फे राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम

पुणे – उज्जैन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या महाकाल लोक लोकार्पण कार्यक्रमनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे,  केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील , वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह पक्षाचे अनेक खासदार , आमदार , पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही  मुंबईत या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉर चे लोकार्पण करण्यात आले. वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरापाठोपाठ महाकाल मंदिराच्या परिसराचा विकास करण्यात आला आहे. या निमित्त राज्यभर भारतीय जनता पार्टीतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उज्जैन येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि पूजा – आरती असे कार्यक्रम झाले .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबईतील बाबुलनाथ येथील मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे भंडारा येथे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले  हे त्र्यंबकेश्वर येथे,  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई, भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार हे मुंबईत,  सहकार मंत्री अतुल सावे हे घृष्णेश्वर येथे, खा. प्रताप पाटील चिखलीकर हे औंढा नागनाथ येथे तर आ. माधुरी मिसाळ ह्या भीमाशंकर येथे झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विधान परिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे यांच्यासह पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी ठिकठिकाणी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.