Karnataka : बेळगावात मतदारांना वाटण्यासाठी आणलेले 1600 कुकर जप्त

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरु असून  (Karnataka Election 2023) राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जात आहेत. यातच आता मतदारांना कुकर वाटप करून आमिष दाखवण्याचे देखील प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील तेग्गीहाळ गावात शेतातील शेडमध्ये  मतदारांना वाटण्यासाठी अवैधरीत्या साठवून ठेवण्यात आलेले 1600 कुकर पोलिसांनी जप्त केले आहेत.

रामदुर्ग आणि सौंदत्ती तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या तेग्गीहाळ गावात शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये कुकर अवैधरीत्या साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथक आणि एफ एस टी पथकाने शेतातील शेडवर धाड टाकून अवैधरीत्या साठा करून ठेवण्यात आलेले सोळाशे कुकर जप्त करण्यात आले.

सौंदत्ती पोलीस आणि एफ एस टी पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी सौंदत्ती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कुकर कोणी आणून ठेवले होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. निवडणूक जवळ येत असल्याने अनेक उमेदवार मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी विविध भेटवस्तू देण्यात येत आहेत. त्यातलाच हा प्रकार असल्याचं सांगण्यात येतंय. पोलिस पुढील तपास करत आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.