मोदींच्या सुरक्षेत त्रुटी आहे की शेतकऱ्यांचा रोष आहे, याचा शोध घेण्याची गरज – टिकैत 

नवी दिल्ली-  पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) पंजाबच्या (Punjab) फिरोजपूरमध्ये होणारी रॅली (Rally) काल रद्द करण्यात आली. सुरक्षेत मोठी चूक झाल्यानं ही रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं (Home Ministry) दिलीय. मोदींचा ताफा 15 ते 20 मिनिटं फ्लायओव्हरजवळ फसला होता, आंदोलकांनी रस्ता अडवला होता, असं गृह मंत्रालयानं म्हटलंय.

केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता, ते पंजाबमधील तेथील जनतेला संबोधित करणार होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते.दरम्यान,पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींवरून काँग्रेस आणि भाजप आमने -सामने आले आहेत.

यातच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सुरक्षेमध्ये त्रुटी आहे की शेतकऱ्यांचा रोष आहे, याचा शोध घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.भारतीय किसान युनियन (बीकेयू) नेते टिकैत यांनी ‘कू’वर लिहिले की,  पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणामुळे रॅली रद्द झाल्याचं भाजपकडून सांगितले जात असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री रिकाम्या खुर्च्या असल्यानेच मोदी परत गेले असा दावा कॉंग्रेस करत आहे. आता मोदींच्या सुरक्षेत त्रुटी आहे की शेतकऱ्यांचा रोष आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे.