‘… अखेर अडीच वर्षानंतर घराबाहेर पडणारा, मैदानात उतरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला’

मुंबई : मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या (BMC) आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले 24 तासात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या सीसीटीव्ही द्वारे संपूर्ण पावसाच्या सद्यस्थिती वरती पूर्णपणे नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवून सर्वसामान्य नागरिकांना पावसामुळे कुठे अडचणीत सापडल्यास तत्काळ मदत करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या कृतीची तारीफ भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. मात्र हे कौतुक करताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देखील चिमटा काढला आहे. भातखळकर आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात, अखेर अडीच वर्षानंतर घराबाहेर पडणारा, मैदानात उतरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला…असं त्यांनी म्हटले आहे.