राज्यसभा निवडणूक : कॉंग्रेसची डोकेदुखी वाढली; तीन आमदारांशी संपर्क होईना 

हरियाणा – राज्यसभा निवडणुकीसाठी हरियाणात राजकीय खलबते तीव्र होताना दिसत आहेत. येथे काँग्रेसला राज्यसभेची एकही जागा वाचवणे कठीण झाले आहे. पक्षाच्या सर्व प्रयत्नांनंतरही आता राज्यसभेची जागा हातातून निसटताना दिसत आहे. क्रॉस व्होटिंगच्या भीतीने पक्षाने सर्व आमदारांना छत्तीसगडला हलवले, परंतु तीन आमदार बेपत्ता असल्याचे सांगितले जाते, जे अद्याप रायपूरच्या रिसॉर्टमध्ये पोहोचलेले नाहीत. यामध्ये नाराज आमदार कुलदीप बिश्नोई यांचा समावेश आहे.

असे सांगण्यात येत आहे की, हरियाणातील काँग्रेसचे आमदार कुलदीप बिश्नोई व्यतिरिक्त किरण चौधरी आणि चिरंजीव राव रायपूरमध्ये पोहोचले नाहीत. या तीन आमदारांनी पक्षाची चिंता वाढवली आहे. त्यांना कसे तरी समजावण्याचा  प्रयत्न केला जातआहे. कारण तसे झाले नाही तर हे तीन आमदार काँग्रेसचा खेळ बिघडवू शकतात. त्यामुळे पक्षाच्या हातातून राज्यसभेची जागा निसटणार आहे. मात्र, पक्षाचे आमदार लवकरच रायपूरला पोहोचतील, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.

90 सदस्यांच्या हरियाणा विधानसभेत काँग्रेसचे केवळ 31 आमदार असल्याने विजयासाठी तितक्याच आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. पक्षाकडून अपक्ष आमदाराचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत पक्षाच्या तीन आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यास त्यांना राज्यसभेची जागा मिळणे कठीण आहे. या क्रॉस व्होटिंगच्या भीतीने काँग्रेसने आपल्या आमदारांना रायपूर गाठण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर सर्व आमदार रायपूरच्या रिसॉर्टमध्ये पोहोचले, मात्र तीन आमदार अनुपस्थित राहिले.

कार्तिकेय शर्मा यांना मोठी संधी

आता काँग्रेसची समीकरणे बिघडत असल्याचे दिसत असतानाच दुसरीकडे अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांना ही मोठी संधी असल्यासारखे आहे. शर्मा यांनी आपल्या उमेदवारीमुळे हरियाणा राज्यसभा निवडणूक खूपच मनोरंजक बनवली. त्यांना भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष जेजेपीचा पाठिंबा आहे. भाजपकडे 41 आमदार आहेत, तर जेजेपीकडे 10 आमदार आहेत. सहा अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. प्रत्येकी एक आमदार INLD आणि हरियाणा लोकहित पक्षाचा आहे. अशा परिस्थितीत शर्मा यांना काँग्रेसच्या काही आमदारांची मते मिळाली तरी ते सहज राज्यसभेची जागा काढून घेतील.