IPL 2023 च्या लिलावात ‘या’ देशाच्या खेळाडूंचे वर्चस्व, फक्त 6 खेळाडूंना मिळणार 53.90 कोटी रुपये

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाच्या लिलावात इंग्लिश खेळाडूंचे वर्चस्व होते. फ्रँचायझींनी इंग्लंडच्या खेळाडूंवर खूप पैसा खर्च केला आणि त्यांना आपल्या संघात घेण्यासाठी सर्व रेकॉर्ड तोडले. इंग्लंडच्या फक्त तीन खेळाडूंना 48 कोटी रुपये मिळाले. हा मिनी लिलाव असला तरी त्यात इंग्लिश खेळाडूंनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

करनला विकत घेण्यासाठी त्याच्या दोन जुन्या संघ पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये दीर्घ लढाई झाली, ज्यामध्ये पंजाबने बाजी मारली. यासोबतच करन या लीगमध्ये सर्वाधिक विक्री होणारा खेळाडूही ठरला आहे. पंजाब किंग्जने त्याला तब्बल 18.50 कोटी रुपयांमध्ये सामील केले आहे.

चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्सला 16.25 कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात समाविष्ट केले आहे. बेन स्टोक्सची आयपीएलमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. यापूर्वी 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सने 14.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. एकेकाळी तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होता.

या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्रूकने लिलावात अनेक संघांमध्ये बोलीचे युद्ध रंगले. राजस्थान रॉयल्सशी निकराची झुंज जिंकल्यानंतर हैदराबादने ब्रूकला १३.२५ कोटींमध्ये करारबद्ध केले.

तीन खेळाडू चढ्या भावात विकल्यानंतर काही खेळाडू कमी किमतीतही विकले गेले. आयपीएलमध्ये केवळ एकच सामना खेळलेला लेगस्पिनर आदिल रशीदला सनरायझर्स हैदराबादने 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. वेगवान गोलंदाज रीस टोपलीलाही आयपीएल करार मिळाला आहे. 75 लाखांची मूळ किंमत असलेल्या टोपलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 1.90 कोटी रुपयांना विकत घेतले. आक्रमक फलंदाज फिलिप सॉल्टलाही त्याच्या आधारभूत किमतीत विकले गेले आहे. दिल्ली कॅपिटल्सने सॉल्टला 2 कोटी रुपयांना विकत घेतले.