अमृता फडणवीस यांच्याबाबत खालच्या पातळीवर बोलणे पवार साहेब – सुप्रिया सुळे कसे काय खपवून घेतात?

नवी मुंबई – नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांची जीभ घसरली असून अमृता फडणवीस यांचाआक्षेपार्ह शब्दाचा उल्लेख त्यांनी भाषणात केला आहे. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवाब मालिकांच्या ईडीने केलेल्या कारवाईविरोधात आंदोलन चालू असताना आपल्या भाषणात त्यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. विशेष म्हणजे या वाचाळवीर नेत्याला आपण महिलांचा कायम सन्मान करण्याची शिकवण देणाऱ्या शिवरायांच्या नावाने असणाऱ्या चौकात भाषण करत आहोत याचे देखील भान राहिले नसल्याचे दिसत आहे.

“आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते”, असे आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असेही ते म्हणाले.या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ‘आझाद मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या, वारंवार महिलांचा सन्मान या विषयावर बोलणार्‍या राष्ट्रवादी पक्षाने गावडे यांची तातडीने हकालपट्टी करावी.

अमृता फडणवीस या त्यांना जिथे जे योग्य वाटेल त्या वेळेला व्यक्त होत असतात. कदाचित काही जणांना ते आवडतही नसेल,परंतु महिलांच्या सन्मानाची शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवरायांचे नाव असलेल्या चौकात दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तीच्या समर्थनाविषयी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी गावडे यांनी अमृताजी फडणवीस यांच्याबाबत खालच्या पातळीवर बोलणे पवार साहेब आणि सुप्रिया सुळे कसे काय खपवून घेतात? आता बरं महिला आयोगाने तात्काळ दखल नाही घेतली,हेच आहे का राष्ट्रवादीचे महिला धोरण. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.