पठाण सिनेमातील दीपिकाच्या ‘भगव्या बिकिनी’वर भाजपाच्या तुषार भोसलेंचा आक्षेप, कारवाईचा इशारा

जानेवारी २०२३ मध्ये बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. नुकतेच या सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukon) ही अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. अनेकांनी गाण्यातील दीपिकाच्या हॉट लूकला पसंती दर्शवली आहे. तर काहींनी तिच्या लूकवर टीका करत सोशल मीडियावर #BoycottPathaan हॅशटॅग ट्रेंडमध्ये आणला आहे.

अशातच आता भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी बेशरम रंग गाण्यातील एका दृश्यावर आक्षेप नोंदवला आहे. या गाण्यातील एका दृश्यात दीपिका केशरी रंगाच्या बिकिनीत दिसत आहे. पठाण सिनेमात भगव्या रंगाची बिकिनी घालणे, म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या भगव्याचा अपमान होय, अशी बिनबुडाची टीका भाजपाच्या तुषार भोसले यांनी केली आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

आमचा स्वाभिमान असलेल्या भगव्या रंगाचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाहीत; ‘पठाण’ चित्रपटातील ‘ती’ दृश्य वगळावीत अन्यथा मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल!, असा इशारा तुषार भोसलेंनी दिला आहे. सातत्याने बॉलीवूड असो वा चित्रपटांच्या माध्यमातून हिंदुविरोधी लोकं त्यांचा हिंदुविरोधी अजेंडा चालवण्यासाठी अशी कृत्ये करत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

परंतु तुषार भोसले यांच्या या वक्तव्यानंतर पठाण नावाचा सिनेमा आहे म्हणून भगव्या रंगाचे कपडे घालू नयेत का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.