औरंगजेबाच्या किला-ए-अर्क महालाचे संवर्धन करा;राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीने नवा वाद

औरंगाबाद –  औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेसकडून औरंगजेबाच्या महालाचे संवर्धन करा, अशी धक्कादायक मागणी करण्यात आली आहे. यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून भाजपसह मराठा क्रांती मोर्चाने देखील यावर आक्षेप नोंदवला आहे.

दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार,  राष्ट्रवादी काँग्रसचे राज्य उपाध्यक्ष इलियास किरमाणी (Nationalist Congress State Vice President Ilyas Kirmani) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, किला-ए-अर्क महल हा मुघल शासक ‘सम्राट औरंगजेब’ ने सण 1650 मध्ये बांधला होता. आज तो जीर्ण अवस्थेत पडून आहे. या महालाचे कालांतराने नुकसान झाले, असून शासनाच्या निष्काळजीपणामुळे त्याने गतवैभव गमावले आहे.

एके काळी हे अतिशय सुंदर स्मारक होते. त्याचे संवर्धन व्हावे, त्यांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्याची आज अत्यंत गरज आहे. या महालाला पुनसंचयित केल्यास, ते आपल्या ऐतिहासिक शेहराचे आणखी एक पर्यटन स्थळ बनू शकते. अशा संरचना अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शासनास लाभधारक ठरू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य उपाध्यक्ष इलियास किरमाणी यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या या पत्रामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

या परिसरात शाही मस्जिद, आदिल दरवाजा, झेबुन्निसा महाल, पाल्मार कोठी, जनाना महाल, जनाना मस्जिद व मर्दाना महालाचा समावेश आहे. किले अर्कमध्ये आज ही आलिशान महाल, सुंदर मोगल गार्डनचे अवशेष, राज सिंहासनची जागा, दिवान ए आम व दिवान व खासची जागा, मंत्र्यांचे दालन, शयनकक्ष व हमाम खानेचे अवशेष आज ही बघू शकतो. आपणास विनंती आहे कि जी. 20 अंतर्गत शहराच्या सुशोभीकरणामध्ये व स्मार्ट सिटीच्या बजेटमध्ये या किले अर्काचा ही समावेश करण्यात यावा. संरचनेत देखभालीचा अभाव आहे, आणि या महालाची स्थिती बिघडली आहे.