तात्या कधी येताय… वाट पाहतोय; अजित पवार यांची थेट वसंत मोरे यांनाच ऑफर

Pune – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात येण्यासाठी जाहीर आवाहन केलंय.‘तात्या, कधी येता, वाट पहातोय’, अशा शब्दात अजित पवार यांनी मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची विनंती केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या या प्रस्तावाला वसंत मोरे यांनीही दुजोरा दिला. मात्र, पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

पुण्यातील एका विवाह सोहळ्यासाठी वसंत मोरे आणि अजित पवार उपस्थित होते. या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यानंतर ‘तात्या, कधी येताय, वाट पहातो,’ अशी विचारणा अजित पवार यांनी केली. मोरे हे आधीच मनसेत नाराज आहेत. त्यात आता त्यांना थेट राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानेच पक्षात येण्यासाठी रेड कार्पेट अंथरल्याने तात्या अर्थात वसंत मोरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.