द कश्मीर फाइल्स चित्रपट पाहताना दिल्या पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; प्रेक्षकांनी आरोपींना दिला चोप 

आदिलाबाद – बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, एका बाजूला ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. यातच  एक धक्कादायक व्हिडीओ तेलंगणामधून (Telangana) आला असून येथे चित्रपटगृहामध्ये काही धर्मांधांनी पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा दिल्या.

तेलंगणाच्या आदिलाबाद येथे 18 मार्च रोजी एक अनुचित घटना घडली. येथे चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी भारत विरोधी घोषणा दिल्या आणि पाकिस्तान झिंदाबाद ची नारेबाजी केली. यामुळे खवळलेल्या प्रेक्षकांनी त्यांना पकडले आणि त्यांची चांगलीच धुलाई केली.

चित्रपटगृहामध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांनी पोलिसांनाही पाचारण केले. परंतु पोलीस येईपर्यंत आरोपींनी चित्रपटगृहातून पळ काढला. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.