उत्तरप्रदेशात एमआयएमने सपाची मते खाल्ली; एकप्रकारे भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरले – जयंत पाटील

मुंबई – आरोग्य मंत्री राजेश टोपे हे इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचं निधन झाल्याने सांत्वनासाठी गेले होते अशावेळी राजकीय चर्चा करणे अभिप्रेत नाही.आमची तशी संस्कृती नाही. त्यामुळें अशा चर्चेबाबत बोलणे योग्य नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

राजेश टोपे यांच्या भेटीनंतर एमआयएम युतीबाबत आज चर्चांना उधाण आले होते त्यावर जयंत पाटील यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. उत्तरप्रदेश असो की महाराष्ट्र असो यामध्ये एमआयएमचा प्रयत्न सिद्ध झाला आहे. आता औरंगाबाद महापालिकेत नेमका काय त्यांचा रोल आहे हे स्पष्ट होईल. पालिका निवडणुकीत ते नेमकं भाजपला जिंकवणार आहेत की हरवणार आहेत ते आता कळेल असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

उत्तरप्रदेशमधील समाजवादी पार्टीच्या बहुतांश ठिकाणी पराभवाला एमआयएम कारणीभुत आहे. एमआयएमने सिद्ध करायला हवं की त्यांना भाजपच्या विजयात कोणताही रस नाही. त्यांनी समविचारी पक्षाना अपेक्षित भुमिका घ्यायला हवी. त्यांनी विखारी भाषा वापरू नये असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला आहे.