राहुल-सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशात पुन्हा जोरदार कमबॅक करेल; थोरातांचे भाकीत

शिर्डी – येणाऱ्या काळामध्ये सोनियाजी गांधी व खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशात जोरदार  कमबॅक करेल असं भाकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. शिर्डी-कोपरगाव रोडवरील साईसृष्टी लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा व डिजिटल आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिरीष दादा चौधरी, माजी मंत्री पद्माकर वळवी  यांच्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोरात म्हणाले, जाती धर्माच्या नावावर मते मागून सत्तेवर आलेले भाजपा सरकार हे राज्यात अस्थिरता निर्माण करू पाहत आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. अनेक संकटामध्ये जनतेच्या पाठीशी उभे राहिले. सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला रोजगाराचा कायदा, अन्नसुरक्षा कायदा, आरोग्य कायदा, शिक्षणाचा कायदा हे महत्त्वाचे कायदे दिले.

काँग्रेस हा एक विचार असून अनेक संकटातून हा पक्ष पुढे आला आहे. इंदिराजी गांधींच्या काळातही पक्षाला संघर्ष करावा लागला मात्र पुन्हा काँग्रेस पक्षाने भरारी घेतली. आगामी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी काम करा. काँग्रेस पक्ष संघटन वाढवणे अत्यंत गरजेचे असून गोरगरीब माणूस ही खरी काँग्रेसची ताकद आहे त्याला सोबत घ्या असे आवाहन देखील त्यांनी केले.

यावेळी बोलताना प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की, काँग्रेसला मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसह स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसच्या माध्यमातून देशाची मोठी प्रगती झाली आहे. मात्र मागील सात वर्षापूर्वी आलेले भाजपाचे सरकार सातत्याने खोटे बोलत आहे. पंतप्रधान हे खोटे बोलून देश व जनतेची दिशाभूल करत आहेत. कोणतेही काम न करता फक्त जाहिरातबाजी करणाऱ्या या लोकांनी पंधरा लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्याची खोटी आश्वासने दिली. या उलट देशात तीन काळे कायदे लावून शेतकरी विरोधी निर्णय घेतला. भाजपापासून देशाला वाचवण्याकरता काँग्रेस हाच सक्षम पर्याय असून काँग्रेस हा गोरगरिबांच्या विकासाचा पक्ष असल्याचेही पाटील म्हणाले.