केंद्रीय अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांकडून थोडे मार्गदर्शन घ्यावे – सुप्रिया सुळे

मुंबई – काल राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. सुसंस्कृत, आदर्श अशा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या भाषणातून स्व. यशंवतराव चव्हाण आणि कुसुमाग्रजांची आठवण झाल्याचे  त्या म्हणाल्या. याशिवाय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांकडून थोडे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचनाही त्यांनी यानिमित्ताने केली.

राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसावर प्रेम करणारा आहे. देशाचा विकासदर हा आठ आणि नऊ यादरम्यान आहे पण महाराष्ट्र राज्याचा विकासदर बारा टक्क्यांवर म्हणजेच डबल डिजीटमध्ये असल्याबाबत सुप्रियाताईंनी समाधान व्यक्त केले. सर्वाधिक जलद गतीने विकासकामे होणारे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याचा उल्लेख होतो हे केंद्रीय अहवालातून समोर आले असल्याचेही सुळे म्हणाल्या.

केंद्र सरकारच्या बजेटमध्ये खासदार आणि राज्यांच्या निधीमध्ये काटछाट दिसून येते. परंतु महाराष्ट्राचे बजेट मांडताना अजितदादांनी ना आमदारांवर ना जिल्ह्यांवर अन्याय केला. समान वाटप करून सामाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही या बजेटमध्ये देण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये काटछाट करताना महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांचे थोडेसे मार्गदर्शन घ्यावे, अशी सूचना सुळे यांनी केली.