ईडीकडून दाऊदसंबंधी प्रकरणांमध्ये धाडी; महाराष्ट्रातील एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता

मुंबई – ईडीचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरुन केंद्र आणि राज्यातला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अशातच मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं मोठी कारवाई सुरु केली आहे. काही नेत्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याची माहिती मिळत आहे.

इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एक मंत्रीही या प्रकरणात सहभागी असल्याची ईडीला शंका आहे. हवाला प्रकरणी या मंत्र्यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली आहे.ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छापे मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले आहेत.

दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मुंबईतील सुमारे दहा ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलमां अंतर्गत ही कारवाई केली जात आहे.