‘शाहु-फुले-आंबेडकरांचे नाव घ्यायचं, मात्र केवळ व्यक्तिद्वेषाचे राजकारण करायचं’

पुणे – शाहु-फुले-आंबेडकरांचे नाव घ्यायचं, महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे असं म्हणायचं. मात्र त्यांच्या विचारापासुन फारकत घेत केवळ व्यक्तिद्वेषाचे राजकारण करायचं ही प्रथा वर्तमान महाराष्ट्र राजकारणाच्या व्यवस्थेत होताना दिसते. ज्या विरोधकांनी महाविकास आघाडीला सळो की पळो करून सोडलं ते विरोधकच शिल्लक ठेवायचं नाही. परिणामी लोकशाही महाराष्ट्रात नेस्तनाबुत करायचं असा जणु काही विडा साहेबांनीच उचलल्याचं लक्षात येतं. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा सभागृहात सत्ताधार्‍यांचं जे कटकारस्थान उघडकीस आणलं त्यावरून साहेब हे बरं नव्हं असंच म्हणावं लागेल.असं भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात, स्व.यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील इथपासुन स्व.विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. स्व.गोपीनाथराव मुंडेंना विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसवणारे विलासराव देशमुख तर विलासरावांना मुख्यमंत्री पदावर बसवणारे गोपीनाथराव असे अनेक उदाहरणे राजकिय संस्कृती याच महाराष्ट्राने पाहिली. आता जे घडतं ते खर्‍या अर्थाने लोकशाहीला घातक असुन सरकारी वकिलामार्फत पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करून भाजप नेत्यांना गुन्ह्यात आडकवण्याचा सुरू केलेला प्रयत्न सर्वसामान्य जनतेला चिड आणण्यासारखा.

महाविकास आघाडी सरकारची स्थापना केवळ एकाच नेत्याने केली. ज्यांचं नाव शरदचंद्रजी पवार अर्थात साहेब. 2014 सालात झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती सत्तेवर आली. केंद्रात भाजप सत्तेवर तेव्हापासूनच खर्‍या अर्थाने राज्यात प्रस्थापितांच्या नेतृत्वाला सुरुंग लागला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणुन महाराष्ट्र सुतासारखा सरळ केला. 2019 निवडणुकीत तसं पाहता जनाधार महायुतीला मिळाला. पण साहेबांच्या नेतृत्वाची भुरळ भगव्यांना पडली. मुख्यमंत्री पदासाठी अवसान घातकीपणा करत पुरोगाम्यांच्या विचारात सेना जावुन बसली. खरं तर महाविकास आघाडी सोबत जायला नको असा सुर त्याच काळी राहुल गांधी यांनी काढला होता. कारण शिवसेनेसोबत युती काँग्रेसला परवडणार नाही असं त्यांना वाटत होतं आणि अखेर कालच्या पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा सुफडासाफ झाला. त्यामागे राज्यात शिवसेनेसोबत काँग्रेस हे एक कारण निश्चित पुढे आलं. असो.

महाराष्ट्रात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले यांचे आदर्श सांगत वर्षानुवर्षे पुरोगामी महाराष्ट्राचं राजकारण आणि राजकिय संस्कृती वैचारिक पातळीवरची राहिलेली आहे. यशवंतराव चव्हाणांच्यापासुन अगदी 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पर्यंत पराकोटीच्या व्यक्तिद्वेषाचे राजकारण महाराष्ट्राने पाहिलं नाही. पण जेव्हा एखाद्या नेतृत्वाला जळीस्थळी एखादं नेतृत्व जे आज दिल्ली ते गल्ली पुढे आलेलं दिसतं त्यावेळी व्यक्तीद्वेषाच्या राजकारणाला मनाची पोषकता अधिक निर्माण होते. खरं तर याच महाराष्ट्रात विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे पक्ष वेगळे पण मैत्री आणि वैचारिकता आदर्श देणारी पाहिली. विलासराव देशमुख एकदा म्हणाले गोपीनाथ मुंडेंना विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर मीच बसवलं तर मित्र मुख्यमंत्री झाला आनंद वाटल्याचा जाहिर उल्लेख गोपीनाथ मुंडेंनी केला होता. अगदी वसंतदादा पाटलांनीसुद्धा विरोधक आपलेच असतात हा आदर्श दाखवून दिलेला आहे. लोकशाहीमध्ये विरोधकांना जिवंत ठेवण्याचं काम कधी कधी सत्ताधारीसुद्धा करत असतात. कारण त्यालाच लोकशाही म्हणतात. मात्र वर्तमान महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या नेतृत्वाकडून नव्या पिढीने काही आदर्श घ्यावा अशी नेतृत्वच चुकीच्या पद्धतीने लोकशाहीच संपवुन टाकण्याचं षडयंत्र करताना दिसते.

झालं काय महाविकास आघाडी सरकारला राज्यात सळो की पळो करून भाजपा तथा देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. सत्ताधार्‍यांचा मनमानी कारभार, भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर दुसर्‍या बाजुने ना खाऊँगा ना खाने दुँगा ही शपथ घेवुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ प्रशासन आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात देशातच स्वच्छता मोहिम हाती घेतल्याने महाराष्ट्रात गैरव्यवहारातून माया जमवणार्‍याच्या विरोधात तपास यंत्रणेने अनेकांना धक्याला लावलेले आहे. महाराष्ट्र स्थापनेपासुन या प्रयोगाची गरज होती. पण हे काम केंद्र सरकारच्या मार्फत सद्या होत आहे. त्यामुळे साहजिकच या राज्यात आपलीच मक्तेदारी हे समजुन वर्षानुवर्षापासुन केवळ अर्थप्राप्तीचं राजकारण करणारे बडे मासे गळाला लागले. परिणामी आपण सत्तेत असुनसुद्धा जेलमध्ये जायची वेळ महाराष्ट्रात सताधार्‍यांची आलेली 100 कोटी वसुलीचं टार्गेट ठेवणारे गृहमंत्री जेलमध्ये, शिवसेनेचा एक मंत्री जेलमध्ये आणि ज्या मुंबईला देशद्रोही दाऊद इब्राहीमनं संपवुन टाकण्याचं दुष्कृत्य केलं त्याच्यासोबत महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक यांनी केलेला आर्थिक व्यवहार देवेंद्र फडणवीसांनी उघडकीस आणला. ईडीची चौकशी मलिकांच्या मागे असुन तीही जेलमध्ये आहे. वास्तविक पाहता एखादा कर्मचारी गुन्ह्यात चोवीस तास पोलीस कस्टडीत राहिला तर त्याला निलंबित केल्या जाते. मात्र देशद्रोही नवाब मलिक ईडी कस्टडी दिली, पोलीस कस्टडी आहे त्यांचा राजीनामा सरकार घेत नाही.

विधानसभा अधिवेशनात जनहिताच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधार्‍यांना सळो की पळो करून सोडले. जळी स्थळी फडणवीस दिसु लागले. वास्तविक पाहता लोकशाही मार्गाने सत्ताधार्‍यांना भाजप विरोध करते. असं असताना फडणवीसांनी परवा विधानसभा अधिवेशनात सत्ताधार्‍यांनी विरोधक संपवण्याचं कट कारस्थान उघडकीस आणलं. ते ऐकल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या मनात संताप वाढला आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटलांपासून स्वत: फडणवीस व अनेक मातब्बर नेते यांनाच एखाद्या गुन्ह्यात आडकवून कसा त्रास द्यायचा? याची शक्कल लढवण्यात आली. सरकारी वकिल, पोलीस यंत्रणा हाताशी धरून टाकलेला डाव त्यांच्यावरच फडणवीसांनी परतवुन लावला. आता सत्ताधारी 125 तासाची कॅसेट म्हणा किंवा ही सारी भानगड सत्य नसल्याचा गवगवा करू लागली. राजकिय पोपटपंची करणार्‍यांची भाषा त्यांनी तर स्क्रीप्ट लिहुन देणारे कोण असेही म्हटलं. भाजप नेत्यांनी मात्र सीबीआय चौकशीची मागणी केली. तशी जर चौकशी झाली तर मग राजकारणाचं दुर्दैव आणि व्यक्तिद्वेष किती पराकोटीला जावुन पोहोचला हे सत्य बाहेर येवु शकेल.

एकुण पार्श्वभुमी पाहिल्यानंतर शाहु-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला असं घाणेरडं राजकारण शोभुन दिसेल का? अगदी स्वर्गातसुद्धा यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या डोळ्यांत आश्रु येतील. लोकशाही या मंडळींना नको असेल तर मग हुकुमशाही पद्धतीने राज्य कारभार करायला हवा. दुसरी गोष्ट आपल्यासमोर विरोधकच नको कारण आपली सगळे पाप उघडी पडु लागली अशीच भुमिका ठाकरे सरकार त्यांचे मार्गदर्शक साहेब जाहिरपणे घेवु लागले. अर्थात सरकारी वकिल आणि पोलीस अधिकारी दोघांच्या संवादातला साहेब कोण? कुणाच्या ईशार्‍यावरून हे सारं चाललं? महाविकास आघाडीचे कर्ता करविता कोण? या सर्व गोष्टी राज्यातील सर्वसामान्य जनतेला समजत नाहीत असं नाही. निवडणुक उत्तरप्रदेशाची मात्र छाती ठोकुन महाराष्ट्रातले काही नेते उगीच उसणं अवसान आणायचे. शेवटी निकाल हाती आला. डोळे पांढरे पडले. त्यामुळे सरकार आणि त्याने केलेलं काम हेच खर्‍या अर्थाने सामान्य जनतेला दृष्टीस पडतं. प्रश्न एकच आहे ठाकरे सरकारनं उघड भुमिका घ्यावी. महाराष्ट्रात आम्हाला विरोधक नको. तुम्हीच ठरवा साहेब काय करायचं?