भाजपने ४ राज्यात मिळवलेला विजय किती मोठा आहे हे ही आकडेवारी पाहिल्यावर तुम्हाला नक्की समजेल

नवी दिल्ली- पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं चार राज्यांत आपली सत्ता कायम राखली तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं ऐतिहासिक विजय मिळवला. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षानं सलग दुसऱ्यांदा सत्ता कायम राखत ऐतिहासिक कामगिरी केली. राज्यात 403 पैकी 255 जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तर भाजपाचा मित्र पक्ष अपना दलाला 12 आणि निषाद पक्षाला 6 जागा मिळाल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघात 1 लाख 3 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून विजयी झाले आहेत.

समाजवादी पक्षाला 111 जागा जिंकता आल्या. समाजवादी पक्षाच्या आघाडीतल्या राष्ट्रीय लोक दलाला 8, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाला 6 आणि जनसत्ता लोकतांत्रिक पक्षाला 2 जागा मिळाल्या. काँग्रेसला उत्तर प्रदेशात केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला. बहुजन समाज पक्षाचा एकच उमेदवार निवडून आला आहे.

उत्तराखंडमध्ये 70 पैकी 47 जागा जिंकून भाजपानं संपूर्ण बहुमत मिळवलं आहे. काँग्रेस 19 तर बसपा आणि अपक्ष उमेदवार प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाले. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक आणि काँग्रेस नेते प्रीतम सिंग यांनी आपापल्या मतदारसंघात विजय मिळवला.

गोव्यात भाजपाला 20 जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला 11, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि आप ला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या. गोव्यात अपक्षांनी 3 जागांवर विजय मिळवला. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला गोव्यात एकही जागा जिंकता आली नाही.

दरम्यान सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू करण्यासाठी भाजपाच्या केंद्रिय समितीचे सदस्य आज गोव्यात दाखल होतील. आजच्या बैठकीत भाजपाच्या विजयी उमेदवारांसह भाजपाला पाठिंबा जाहीर केलेले तीन अपक्ष उमेदवार सहभागी होतील. या बैठकीत नेत्याची निवड झाल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा दाखल करू असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल सांगितलं.

मणिपूरमध्ये 60 पैकी 32 जागांवर विजय मिळवत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं. नॅशनल पीपल्स पार्टीला 7 , संयुक्त जनता दलाला 6, काँग्रेस आणि नागा पीपल्स फ्रंटला प्रत्येकी 5 जागा मिळवता आल्या. पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं निर्विवाद बहुमत मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला. पंजाब विधानसभेच्या 117 जागांपैकी 92 जागंवर आपचे उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसला 18 जागा जिंकता आल्या तर अकाली दलाला 3 जागांवरच विजय मिळवता आला. भाजपाला दोन जागांवर विजय मिळाला.