‘लवंगी फटाका त्यांनी फोडला, दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडणार’

मुंबई – नवाब मलिक यांनी माझी पत्नी अमृता फडणवीस यांची एक सेल्फी जारी केली, त्यासंदर्भात ‘रिव्हर मार्च’ या संघटनेने कालच सुस्पष्ट खुलासा केलेला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी लवंगी फटाका फोडला असला तरी दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडीन. नबाव मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत आणि याचे सर्व पुरावे मी माध्यमांसमोर उघड करीन आणि ते सर्व पुरावे श्री शरद पवार यांना सुद्धा देणार आहे, असा पटलवार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना केला.

‘रिव्हर मार्च’ या संस्थेने त्यांच्या प्रसार अभियानासाठी एक कटेंट टीम भाडेतत्त्वावर घेतली होती. ‘नदी बचाओ’ या अभियानाशी माझी पत्नी सुद्धा जोडलेल्या होत्या. त्यावेळी त्या कंटेट टीममधील कर्मचार्‍यांनी सेल्फी काढल्या होत्या. रिव्हर मार्चसोबत आलेल्या कुणाशीही आमचा संबंध नाही. या लोकांनी माझ्यासोबतही फोटो काढले होते. पण, नवाब मलिक यांनी तो फोटो जाणूनबुजून दिला नाही. माझ्या पत्नीसोबतचा 4 वर्षांपूर्वीचा फोटो दिला. यातूनच त्यांची मानसिकता लक्षात येते. आता अशाच फोटोवरून संबंध जोडायचे असतील तर नवाब मलिक यांचा जावईच ड्रग्ज प्रकरणात सापडला आहे, मग संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ही ड्रग्ज माफियांची पार्टी म्हटली पाहिजे. पण, मी तसे म्हणणार नाही. नवाब मलिक यांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडला असला तरी दिवाळीनंतर बॉम्ब मीच फोडणार. नबाव मलिक यांचे अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, याचे सर्व पुरावे मी माध्यमांना आणि श्री शरद पवार यांना देणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नीरज गुंडे यांच्याबाबत नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना ते म्हणाले की, निरज गुंडे हे माझ्याआधीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मित्र आहेत. ते दररोज राष्ट्रवादीचेच घोटाळे बाहेर काढतात, त्यामुळे हिंमत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. वाझे पाळण्याची सवय त्यांना आहे, आम्हाला नाही. नवाब मलिक यांचा खोटारडेपणा यापूर्वीही उघड झाला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. जे आजपर्यंत बाहेर आले नाही, ते आता मी बाहेर आणीन. एक मात्र सांगतो की, मी आजवर कधीही विनापुरावे आरोप केले नाहीत आणि आजवर केलेले कोणतेही आरोप मी मागे घेतलेले नाहीत. ‘मै काच कें घर में नही रहता.’ केवळ आणि केवळ एनसीबी दबावात यावी आणि स्वत:चा जावई सुटावा, यासाठी नबाव मलिक यांचा संपूर्ण आटापिटा सुरू आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.