कोलकाता महापालिका निवडणुकीत ममतादीदींची जादू कायम; भाजपाला दोन आकडी संख्याही गाठण्यात अपयश

कोलकाता –  कोलकाता महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, येथे टीएमसी पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. येथे मुख्य लढत टीएमसी आणि भाजपमध्ये आहे. त्याचवेळी काँग्रेस, डावे पक्ष यासारख्या अन्य राजकीय संघटनाही रिंगणात आहेत.

कोलकाता महापालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजयी वाटचाल सुरु केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार तृणमूल १३४ जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे भाजपा ३, डावे ४ आणि काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर आहे.

कोलकातामध्ये १६ मतदान केंद्रांवर १४४ वॉर्डमधील मतमोजणी सुरु आहे. मतमोजणी सुरु असल्याने कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आले आहे. तसंच २०० मीटर परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना २०० मीटरच्या अंतरात प्रवेश करण्याची परवानगी नाही.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत विजयाकडे वाटचाल करणाऱ्या तृणमूल समर्थकांनी आता जल्लोष सुरू केला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर तृणमूलचे कार्यकर्ते आणि समर्थक आनंद साजरा करत आहेत.