‘राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही, रामलल्ला प्रसन्न होणार नाहीत’

 रत्नागिरी   – मनसेचे  अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray)  यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही,  अशी धमकी भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह (BJP MP Brijbhushan Sharan Singh)  यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असताना भाजपाचे कैसरगंजचे खासदार बृजभूषण सिंह (BJP’s Kaisarganj MP Brijbhushan Singh) यांनी स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी राज यांना आव्हान दिले आहे. दरम्यान, एका मराठी नेत्याला अशा पद्धतीने इशारे जात असताना राज्यातील सर्वपक्षीय नेते मात्र या संघर्षाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. राज्यातील एकही मोठा मराठी नेता राज ठाकरे या मराठी नेत्याच्या पाठीमागे उभा राहताना दिसत नसल्याचे चित्र आहे. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार या देशाचा नागरिक देशातील कोणत्याही भागात जाऊ शकतो मग राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून रोखणारे हे महाशय कोण हा सवाल देखील उपस्थित होत आहे.

एक यूपीतील खासदार अशा पद्धतीने धमक्या देत असताना दुसऱ्या बाजूला शिवसेनेने देखील बृजभूषण शरण सिंह यांच्या सुरात सूर मिसळला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनीही राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यावर जाण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर गेले होते तेव्हा राज यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून त्याची टिंगलटवाळी केली होती. आता याच राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यावर जावं लागत आहे. हे सर्वकाही राजकीय स्वार्थासाठी सुरु आहे. राज यांना अयोध्येला जाण्याचा नैतिक अधिकार नाही. रामलल्ला राज यांना प्रसन्न होणार नाहीत, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.