…अन्यथा तुमच्या वयाचा विचार न करता गरज पडली तर तुमचं धोतर फेडू, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात आता त्यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केल्याने नवा पेटण्याची चिन्ह आहेत. चाणक्याशिवाय चंद्रगुप्त नाही तसंच समर्थांशिवाय शिवाजी महाराज नाहीत असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. ते आज औरंगाबादमध्ये मराठी भाषा गौरव दिवस आणि श्री दास नवमी निमित्त आयोजित केलेल्या समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना त्यांनी आपल्या भाषणामध्ये हे वक्तव्य केलं.

आज मराठी भाषा गौरव दिवस आहे, यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. राम मंदिर कार्यक्रम सुरू असताना मला समर्थ रामदासांचे नाव आठवत होते वेळोवेळी देशात संतांचे कार्य दिसले आहे. शक्तीची सर्वत्र पूजा होते, माजी आमदार, खासदारांना कोणी विचारत नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

तसंच शक्ती सर्वकाही आहे, त्यामुळे शक्तीची आराधना केली जाते आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरु मिळाला तो यशस्वी होतो, जसं चाणक्य नसते तर चंद्रगुप्त नसते तसंच जर समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यपालांच्या या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याचे चिन्ह आहेत.

राज्यपालांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता संताप व्यक्त केला जातोय. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना राज्यपालांना थेट इशारा दिला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी काल शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं. माहिती नसलेला इतिहास आमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे बघितल्यानंतर राज्यपालांच्या पोटात जे होतं, ते ओठावर आलेलं आहे. राज्यपालजी, आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराज कळले नसतील, तर कृपया त्या विषयात नाक खुपसू नका. चुकीच्या गोष्टी आमच्यासमोर मांडू नका, तुमच्या वयाचा विचार करता, तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, हे कालच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे. भारताचे पंतप्रधानांना विनंती आहे, आवाहन आहे की, तात्काळ अशा राज्यपालांची उचलबांगडी करावी. असे राज्यपाल महाराष्ट्राला नको. यांना छत्रपती शिवाजी महाराजच कळलेले नाहीत. राज्यपाल महोदय, आपण तत्काळ माफी मागावी, अन्यथा आम्ही तुमच्या वयाचा विचार न करता गरज पडली तर तुमचं धोतर फेडू. एक शिवभक्त म्हणून या ठिकाणी ठामपणे आपल्याला सांगतो. ‘ असं विनोद पाटील यांनी म्हटलंय.