वीरेंद्र सेहवागची बहीण अंजू सेहवाग यांनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश

नवी दिल्ली- भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाग याची बहिण अंजू सेहवाग-मेहरवाल यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. दिल्लीतील पक्ष कार्यालयात त्यांना सदस्यत्व देण्यात आले.

आम आदमी पक्षाच्या कार्याच्या कक्षा आता रूंदावत आहेत. आपच्या कार्याची पद्धत ही भ्रष्टाचारमुक्त राजकारण अशी आहे. मी समाजसेवा करणारी स्त्री आहे. त्यामुळे मला आपच्या कार्यातून प्रेरणा मिळाली आणि मी आपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. कारण समाजसेवेसह राजकारणाच्या माध्यमातून देशातील लोकांची सेवा करण्यासाठी माझंही योगदान असावं म्हणून मी पक्षप्रवेश करत आहे असंही त्यांनी सांगितलं.

वीरेंद्र सेहवागला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. मंजू आणि अंजू या दोघी बहिणी त्याच्यापेक्षा मोठ्या आहेत. सेहवागचे कुटुंब मूळचे हरियाणाचे आहे. पण हे लोक दिल्लीत स्थायिक झाले आहेत. अंजू यांचा जन्म हरयाणाच्या झज्जर जिल्ह्यातील छुड्डानी या गावी झाला.

पुढे दिल्लीतील प्रसिद्ध उद्योगपती चौधरी रविंद्र सिंह मेहरवाल यांच्याशी अंजू यांचा विवाह झाला. त्यानंतर अंजू यांनी समाजकार्याला सुरूवात केली आणि कालांतराने राजकीय कारकिर्दीलाही सुरूवात केली. २०१२च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दक्षिणपुरी विस्तारित या वॉर्डमधून त्या निवडून आल्या.