‘रनमशीन’ विराट कोहलीने नवीन वर्षाची केली शानदार सुरुवात, श्रीलंकेविरुद्ध झळकावले शतक

गुवाहाटी- भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आज खेळला गेलेला पहिला वनडे (First ODI) सामना खऱ्या अर्थाने भारतीय फलंदाजांनी गाजवला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने शुबमन गिलसोबत मिळून संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. त्यानंतर हाच पवित्रा पुढे कायम ठेवत विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले. या शतकासह (Virat Kohli Century) त्याने नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात केली आहे.

विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ८० चेंडूत १० चौकार १ षटकार ठोकत शतक झळकावले आहे. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील ४५वे शतक असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील एकूण ७३ वे शतक ठरले आहे. याबरोबरच विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा सक्रिय क्रिकेटपटूही आहे. शिवाय विराटचे हे श्रीलंका संघाविरुद्ध वनडेतील नववे शतक होते. श्रीलंकेविरुद्ध ४७ वनडे सामने खेळताना विराटने ही शतके केली आहेत.

विराटपूर्वी रोहितने शुबमन गिलसोबत (Shubman Gill) सलामीला फलंदाजीला येत झंझावाती अर्धशतक झळकावले. ६७ चेंडूंचा सामना करताना १२३.८८ च्या स्ट्राईक रेटने त्याने ८३ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ षटकार आणि ९ चौकार निघाले. हे रोहितचे सलग दुसऱ्या वनडे सामन्यातील अर्धशतक होते. मागील वनडे सामन्यात त्याने नाबाद ५१ धावा केल्या होत्या. याबरोबरच रोहितने वनडेतील ९५०० धावांचा टप्पाही ओलांडला आहे.