शिवसेनेकडून संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी नाहीच; संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई – शिवसेना छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी देणार की नाही यावर तर्क-वितर्क लढवले जात असताना अखेर संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी अद्याप अधिकृत घोषणा करणं बाकी असल्याचंही सांगितलं. दुसऱ्या जागेसाठी आपलं नावही ठरलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.राऊत म्हणाले, संजय पवार यांचं नाव अंतिम झालं आहे. संजय पवार शिवसेनेचे मावळे असून उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि उमेदवार विजयी होतील.

कोण आहेत संजय पवार ?

कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार हे कट्टर शिवसैनिक ओळखले जातात. 1989 पासून ते कोल्हापूरमध्ये शिवसेना पक्षात कार्यरत आहेत. बेळगाव सीमाभागात मराठी बांधवावर होणाऱ्या कानडी अत्याचाराविरोधात रस्त्यावरच्या आंदोलनात संजय पवार हे नेहमी असतात. 1990, 1996, आणि 2005 असे तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत शिवसेना नगरसेवक राहिले आहेत. 2005साली त्यांनी कोल्हापूर महापालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून काम पाहिलं आहे.

तालुका प्रमुख, शहर प्रमुख ते जिल्हा प्रमुख असं पद भूषवणारे संजय पवार हे शिवसेनेतील जुने आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. 2008पासून ते शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख आहेत. 2018 ते २2020 या काळात त अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष राहिले आहेत. या पदाला राज्यमंत्री दर्जा असतो.