दु:खद बातमी! जेष्ठ दाक्षिणात्य अभिनेते चलपति राव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मनोरंजन विश्वातून पुन्हा एकदा एक वाईट बातमी ऐकायला मिळत आहे. ज्येष्ठ तेलुगू अभिनेता चलपति राव (Chalapathi Rao) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर टॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चलपति राव यांच्या मुलीसाठी त्यांच्या अंत्यसंस्काराला उशीर होणार असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांची मुलगी अमेरिकेत राहते आणि ती परतल्यानंतरच त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. चलपति राव यांचे पार्थिव त्यांचे पुत्र रवी बाबू यांच्या बंजारा हिल्स येथील घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. चलपति राव यांच्या पार्थिवावर २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चलपति राव यांचा मुलगा रवी बाबू हा देखील टॉलीवूडमधील अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे.

चलपति राव यांनी 600 चित्रपटांमध्ये काम केले होते
चलपति राव यांचा जन्म 1944 मध्ये आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील बल्लीपरु येथे झाला होता. सीनियर एनटीआर यांच्या सांगण्यावरून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. चलपति राव यांनी 1966 मध्ये गुडचारी 116 या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी सीनियर एनटीआर, कृष्णा, अक्किनेनी नागार्जुन, चिरंजीवी आणि व्यंकटेश यांच्या चित्रपटांमध्ये सहकलाकार आणि खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत.

त्यांनी यामागोला, युगपुरुषुडू, जस्टिस चौधरी, बॉबिली पुली, निनान पेल्लादाता आणि अल्लारी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राव यांनी पाच दशकांच्या कारकिर्दीत 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी निर्मितीतही हात आजमावला आणि कलियुग कृष्णाडू, कडपाह रेडड्म्मा, जगन्नाटकम पेलांटे नूरेला पंता, प्रेसिडेनिगरी अल्लुडू, अर्धरात्रि हात्यालू आणि रक्तम चिंदिना रात्रि यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली.