सहिष्णू सर्वसमावेशक हिंदू धर्म कदाचित यांच्यामुळेच संपून जाईल – चौधरी

Vishwambhar Chaudhari– शनिवारी भारत व पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ७ विकेट्स राखून धुव्वा उडवला आणि भारतात दिवाळी साजरी झाली! अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) किमान लाखभर क्रीडारसिकांनी एकच जल्लोष केला. मात्र, या सामन्यानंतर तिथल्या काही मुद्द्यांवरून वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. अशीच एक चर्चा म्हणजे सामन्यादरम्यान होत असणाऱ्या ‘जय श्रीराम’च्या (Jai Shri Ram) घोषणा!

पाकिस्तानच्या विकेट्स पडत असताना स्टेडियममध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या जात असल्याचा दावा पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट करून ‘हे योग्य आहे का? श्रीराम यांचा उल्लेख सकारात्मक ऊर्जा वाढवणारा असावा, शत्रुत्व नव्हे’ असा मुद्दा उपस्थित केला आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावर आता सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhari) यांनी भाष्य केले आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात, एक नवा ‘जय श्रीराम’ राष्ट्रवाद भारतात हुल्लडबाजी करून रुजवला जात आहे. क्रिकेटची मॅच जिंकली की तो उफाळून येतो. या देशाचे पंप्र एका अगदीच रद्दी, एकतर्फी सामन्याला सुद्धा तो विशिष्ट देशाविरुद्ध जिंकला असल्यामुळे ‘यह एक ऐतिहासिक विजय है’ असं म्हणून या राष्ट्रवादाला पाठबळ देत असतात. वास्तविक ती अनेक लीग मॅचेस पैकी एक लीग मॅच असते, उपांत्य किंवा अंतिम सामना नव्हे. जे पाकिस्तान विरूद्ध मॅच जिंकल्यावर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत रस्त्यावर येतात ते पंप्रभक्त जेव्हा पंप्र पाकिस्तानात प्रेमाची बिर्याणी खातात तेव्हा मात्र जय श्रीरामचा जयघोष करत नाहीत.

भारत ‘जय हिंद’ कडून ‘जय श्रीराम’ कडे नेणं हा पवित्र हेतू त्यामागे आहे. जय हिंद म्हटल्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनातली पिढी भारतीयांच्या डोळ्यासमोर येते, ती त्यांना त्रासदायक आहे. म्हणून त्या पिढीचं, त्या आंदोलनाचं अस्तित्व मिटवून त्या आंदोलनाची घोषणाही मिटवायची असून १९९२ साली बाबरी पाडून जी हुल्लडबाजी रामाच्या नावावर केली तेव्हाची तीच घोषणा आता त्यांना राष्ट्रीय घोषणा करायची आहे.

आपला म्हणजे मूळ भारतीयांचा राम वाल्मिकी ऋषी पासून व्हाया तुलसीदास गदिमांपर्यंतचा राम पूर्णतः वेगळा आहे. तो कुटुंबवत्सल सीताराम किंवा उत्तरेत सियाराम आहे. तो सुहास्यवदनानं कुटूंबासोबत उभा आहे. तो संतप्त होतो पण अधर्माविरूद्ध. आपल्याच अयोध्या नगरीतल्या लोकांवर नाही. हिंदू धर्मातली सात्त्विकता घालवून त्याला रौद्ररुपात दाखवून, एका वर्गाला भयभीत करणे आणि सत्तेत पुनःपुन्हा येत राहणे हा या राष्ट्रवादाचा संकुचित उद्देश आहे.

यांच्यापासून हिंदू धर्मालाच जास्त धोका आहे. कारण हे परत परत निवडून आले तर आपला हिंदू धर्म हा फक्त इतर काही धर्मांवर सूड घेण्यासाठी निर्माण झालेला धर्म आहे अशी पुढील पिढ्यांची स्वाभाविक धारणा होत राहील आणि खरा, सहिष्णू सर्वसमावेशक हिंदू धर्म कदाचित यांच्यामुळेच संपून जाईल.असं चौधरी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळाले पाहिजे – पटोले

भाजपा आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल:- Nana Patole

चंद्रकांत पाटलांवर सोलापुरात शाईफेकीचा प्रयत्न, भाजपाविरोधात घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?