राजस्थान रॉयल्सची चपळ बोली! जेसन होल्डरला विकत घेत भरून काढली मातब्बर अष्टपैलूची कमी

IPL Auction Live: वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डर (Jason Holder) याला नव्या फ्रँचायझीत जागा मिळाली आहे. संजू सॅमसन याच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ त्याला आपल्या ताफ्यात सहभागी करण्यात यशस्वी ठरला आहे.

अलिकडच्या काळात, जेसन होल्डरने डेथ ओव्हर बॉलर म्हणून स्वतःचे नाव कमावले आहे आणि म्हणूनच आयपीएल 2023 च्या लिलावात त्याला मागणी दिसली. होल्डरवर बोली लावण्याची शर्यत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्जने 5 कोटी रुपयांची बोली वाढवली, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने थोडी प्रतीक्षा केल्यानंतर त्याची किंमत 25 लाख रुपयांनी वाढवली. ही स्पर्धा थोडी पुढे गेली आणि शेवटी राजस्थान रॉयल्सने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर याला 5.75 कोटी रुपयांना विकत घेतले. यासह राजस्थानचा मातब्बर अष्टपैलूचा शोध संपला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

दरम्यान होल्डर मागील हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता. जिथे त्याने 12 सामने खेळताना 14 विकेट्स घेतल्या होत्या. होल्डरच्या एकूण आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास त्याने 38 सामन्यात 49 विकेट्स आणि 247 धावा केल्या आहेत.