‘आम्ही भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहोत, आमची एवढी भीती निर्माण झालीय की…’; चंद्रकांतदादांची राज्य सरकारवर टीका 

मुंबई – राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे.औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

या सर्व घडामोडींमुळे भाजपला शिवसेनेला खिंडीत गाठण्याची संधी मिळाली असून  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  (Chandrakant Patil)  यांनी  महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, एमआयएम (MIM) आणि महाविकास आघाडी (mahavikas aghadi) एकत्र आली तरी काहीच फरक पडत नाही. आम्ही भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहोत. आमची एवढी भीती निर्माण झालीय की सर्वजण एकमेकांचा हात घट्टपणे धरण्याचा प्रयत्न करत आहेत. हात घट्ट धरल्यानंतरही अपयश मिळतं हे लक्षात आल्यावर त्यांच्यात फाटाफूट होईल. आम्ही महाविकास आघाडीला टक्कर देण्यास समर्थ आहोत, असं   चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.