‘आम्ही एक मशिन विकसित केली आहे, जी रस्ताही बनवते आणि माफियांवरही चालते’

चौरी-चौरा- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी गोरखपूरच्या चौरी-चौरा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. योगींनी पुन्हा एकदा बुलडोझरचा उल्लेख करत सपावर टीकास्त्र सोडले.

योगी म्हणाले,  एवढी कामे करण्यासाठी आमच्याकडे पैसा कुठून येतोय, याची चिंता समाजवादी पक्षाच्या लोकांना वाटत आहे. मी म्हणालो की, एक स्पष्ट हेतू असायला हवा. दुसरे म्हणजे, आम्ही एक मशिन विकसित केली आहे, जी रस्ताही बनवते आणि माफियांवरही चालते.

मुख्यमंत्री म्हणाले,  आम्ही बुलडोझरचा उत्तम वापर करत आहोत. पण ते चालवण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. योगी म्हणाले, गोरखपूर ग्रामीण आणि चौरी चौरा भागातील हा अथांग ‘जनप्रवाह’ म्हणजे कट्टर कुटुंबवाद्यांवर राष्ट्रवाद्यांच्या ऐतिहासिक विजयाचे भजन आहे. जनता-जनार्दनच्या आशीर्वादाने येथील प्रत्येक बूथवर कमळाचे फूल फुलणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 5 टप्प्यात मतदान झाले असून सर्वच पक्ष आपल्या विजयाचा दावा करत आहेत. राज्यात आता मतदानाचे दोन टप्पे उरले आहेत. यावेळी राज्यात भाजप आणि सपा आरएलडी युतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मात्र, जनतेने कोणत्या पक्षाला बहुमत दिले आहे, हे 10 मार्चच्या निवडणुकीचे निकालच सांगतील.