उमेश कोल्हे यांच्या खुनामागचे नेमके कारण काय ? नुपूर शर्मा यांचे समर्थन भोवले का ?

अमरावती –  अमित मेडिकलचे संचालक उमेश कोल्हे यांचे निर्घृण खून प्रकरण नुपूर शर्मा वादग्रस्त प्रकरणाशी सबंधित आहे का, याचा काटेकोर तपास करावा अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांना भेटून केली आहे.

शिवराय कुळकर्णी यांनी उमेश कोल्हे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केल्यानंतर शिवराय कुळकर्णी यांनी पोलीस आयुक्तांशी संवाद साधला. उमेश कोल्हे यांचा खुन लुटमारीसाठी झाला असल्याचे निदर्शनास येत नाही. आरोपींनी लुटण्यासाठी चाकू मारला असता तर सोबतचे सामान, पैसे ते घेऊन पळाले असते. शिवाय, या खून प्रकरणात पकडलेले आरोपी यापूर्वी कुख्यात म्हणून प्रसिद्ध नाहीत. रुपये लुटण्यासाठी उमेश कोल्हे दिसताक्षणीच मोठा चायनिज चाकू त्यांच्या गळ्यात खुपसण्याऐवजी धाक दाखवून पैसे पळवण्याचा प्रयत्न झाला असता. हा खून नुपूर शर्मा यांच्या बाजूने समाज माध्यमांवर पोस्ट टाकल्या म्हणून झाला असल्याची जनचर्चा आहे. हे आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत का ? उमेश कोल्हे यांचा मोबाईल सध्या पोलिसांजवळ आहे. त्यांनी नुपूर शर्मा यांना समर्थन देणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या का ? त्यांना धमक्या मिळाल्या होत्या का? त्यांना या महिनाभरात कोणाकोणाचे व कुठून फोन आले ? ते विशिष्ट समाजाच्या लोकांचे होते का , अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी शोधावी, अशी विनंती शिवराय कुळकर्णी यांनी पोलिसांना केली आहे.

उमेश कोल्हे आणि त्यांना आलेले मेसेजेस, कॉल्स याचा सिडीआर बारकाईने तपासला जावा. अमरावती संवेदनशील होऊ नये, पुन्हा अमरावतीतील सामाजिक सौहार्द खराब होऊ नये. यासाठी पोलिसांनी योग्य व कठोर तपास करून कारवाई अशी विनंती शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. नुपूर शर्मा यांचे वक्तव्या वर कायदेशीर कारवाई होऊ शकते. संविधानाने सर्वांना तो अधिकार दिलेला आहे. त्यासाठी रक्तपात होत असेल तर ते चिंताजनक असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.