हे लोक पाकिस्तानमधून…; आरपीएफ जवानाने जयपूर-मुंबई रेल्वेत गोळ्या झाडण्यामागचे कारण आले समोर

महाराष्ट्रातील पालघरमध्ये जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (Jaipur Mumbai Express) एका RPF कॉन्स्टेबलने त्याच्या वरिष्ठ ASI वर अंदाधुंद गोळीबार केला. सोमवारी घडलेल्या या घटनेत गोळी लागल्याने एएसआय आणि अन्य ३ प्रवाशांचा मृत्यू झाला. चेतन सिंह नावाच्या आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केला, ज्याला पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली आहे. आता आरपीएफ जवानाने गोळीबार करण्याचे कारण समोर आले आहे.

रेल्वे सुरक्षादलाचे कॉन्स्टेबल घनश्याम आचार्य हे कॉन्स्टेबल चेतन सिंह आणि सहाय्यक उप-निरीक्षक टीकाराम मीना यांच्यासोबत रविवारी रात्री सुफरफास्ट रेल्वेत ड्युटीवर होते. त्यांनी या घटनेसंबंधी संपूर्ण माहिती दिलेली आहे.

आचार्य यांनी सांगितलं की, जयपूर-मुंबई रेल्वेत एक सहकारी आणि तीन प्नवाशांना गोळी मारणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याने घटनेच्या काही तासापूर्वी आपल्या सहकाऱ्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले होते. आचार्य यांनी सांगितलं की, ते टीकाराम मीना (५८), कॉन्स्टेबल चेतन सिंह (३३), आणि कॉन्स्टेबल नरेंद्र परमार (५८) यांच्यासोबत ड्युटीवर होते. ते जवळपास २.५३ वाजता सुरत ते मुंबई जाणाऱ्या रेल्वेमध्ये चढले. चेतन सिंह आणि टीकाराम मीना एसी कोचमध्ये ड्युटीवर होते, तर आचार्य आणि परमार स्लीपर कोचमध्ये होते.

चेतन सिंह याला अस्वस्थ वाटत असल्याने त्याला रेल्वेमधून उतरायचं होतं, पण त्याला आपली ड्युटी पूर्ण करण्याचे सांगण्यात आले. तसेच मुंबई येथे पोहोचल्यानंतर औषध घेण्याचे सुचवण्यात आले. चेतन सिंह याला याचा खूप राग आला आणि यामुळेच वादाला सुरुवात झाली. रागाने बेभान झालेल्या चेतन सिंहने आपल्या एक कर्मचाऱ्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने रागात गोळी चालवली. तसेच कोचमधील वेगवेगळ्या डब्ब्यात जाऊन प्रवाशांवर गोळ्या चालवल्या. ज्यात तीन प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला.

व्हायरल व्हिडिओत काय म्हणतोय चेतन सिंह
दरम्यान घटनेवेळच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चेतन सिंह बोलताना दिसत आहे. हे लोक पाकिस्तानमधून ऑपरेट झाले होते. म्हणून त्यांना मारल्याचं तो सांगतो. आपली माध्यमेही हेच सांगतील. भारतात रहायचं असेल, तर केवळ मोदी आणि योगीच…, आणि तुमचे ठाकरे असेही चेतन सिंह या व्हिडिओत म्हणताना दिसून येत आहे. त्यामधील त्याचे काही शब्द निटसे ऐकू येत नाहीत.