मोदींना प्रदान करण्यात आला टिळक पुरस्कार, पंतप्रधानांनी पुरस्काराची राशी गंगेला केली समर्पित

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्राच्या पुणे दौऱ्यावर (Narendra Modi Pune Tour) आहेत. येथे ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी पुण्यात पोहोचले आणि प्रथम दगडूशेठ हलवाई मंदिरात जाऊन आरती केली व दर्शन घेतले. यानंतर ते एसपी कॉलेजच्या मैदानावर पोहोचले, तिथे त्यांना टिळक स्मारक मंदिर ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमान्यांची पुणेरी पगडी, उपरणे, सन्मानपत्र आणि केसरीचा पहिला अंक अशा स्वरूपात दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. व्यासपीठावर पंतप्रधान मोदींच्या एका बाजूला शरद पवार बसलेले दिसले तर दुसऱ्या बाजूला त्यांचे पुतणे अजित पवार बसलेले दिसले.

लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर पंतप्रधान म्हणाले, ‘आज मी दगडूशेठ मंदिरात पूजा केली. दगडूशेठ हे पहिले व्यक्ती होते जे टिळकांच्या हाकेवर गणेशमूर्तीच्या स्थापनेला उपस्थित होते. हा सन्मान अविस्मरणीय आहे. टिळकजींशी थेट संबंध असलेल्या संस्थेकडून लोकमान्य टिळक सन्मान मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे.’ पुरस्कारासोबत मला दिलेली रक्कम मी गंगाजींना समर्पित करत आहे. नमामि गंगे प्रकल्पासाठी देणगी देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींकडून घेण्यात आला आहे.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, ‘लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासाच्या कपाळावरचे टिळक आहेत. त्यांची भूमिका, देशाच्या स्वातंत्र्यातील त्यांचे योगदान काही घटना आणि शब्दांत मांडता येणार नाही. मी हा पुरस्कार 140 कोटी देशवासियांना समर्पित करतो.’