“देशात फक्त सेक्स आणि शाहरुख विकला…”, पठाण सुपरहिट झाल्यानंतर नेहा धुपियाचे जुने विधान चर्चेत

Mumbai- ‘बॉलीवूडचा बादशाह’ शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडत पठाणने इतिहास रचला. पठाण चित्रपटासह जवळपास ४ वर्षांनंतर शाहरुखने बॉलीवूडमध्ये धडाकेबाज पुनरागमन केले. पठाणच्या यशानंतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. अशातच अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) हिचे वक्तव्य चर्चेत आले (Neha Dhupia On Shahrukh Khan) आहे.

अलीकडे पठाणच्या यशस्वी कमाईदरम्यान नेहा धुपियाचे एक जुने विधान व्हायरल होत आहे. यावर अभिनेत्रीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. २८ जानेवारी रोजी, एका सोशल मीडिया वापरकर्त्याने नेहा धुपियाचे विधान शेअर केले आणि ट्विट केले की, “जवळपास २ दशकांपूर्वी नेहा धुपियाने ‘फक्त सेक्स आणि #शाहरुखखान विकतो’ असे विधान केले होते आणि ते आजही खरे ठरते आहे!”

वीस वर्षांनंतरही हे सत्य आहे
एका चॅट शो दरम्यान नेहा धुपियाने शाहरुखबद्दल सांगितले होते की, या देशात फक्त सेक्स आणि शाहरुख खान विकला जातो. तिचे हे वक्तव्य आता पठाणच्या विक्रमतोड कमाईनंतर चर्चेत आले आहे. युजरच्या या ट्विटवर नेहा धुपियानेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले की, “२० वर्षांनंतर माझे म्हणणे खरे ठरले. हे ‘अभिनेत्याचे करिअर’ नसून ‘राजाची राजवट’ आहे!”

‘पठाण’ने जगभरात ३०० कोटींचा आकडा पार केला
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरात ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. २५ जानेवारीला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ओपनिंगसह प्रदर्शित झाला आहे.