राज्यात लसीचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी केंद्र सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे – टोपे

जालना – राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून मुंबईतही दैनंदिन बाधितांचं प्रमाण आता केवळ 500 ते 700 रुग्णांपर्यंत मर्यादित झालं आहे. त्यामुळे कोविडसंबंधी लागू असलेले निर्बंध दर आठवड्याला टप्प्याटप्प्यानं कमी करण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.

जालना जिल्ह्यासाठी आय.सी.आय.सी.आय. फाऊंडेशनच्या सहकार्यानं पाच फिरत्या दवाखान्याच्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण जिल्हा सामान्य रुग्णालयात टोपे यांच्या हस्ते काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. शासन निर्बंध कमी करण्याच्या विचारात असून याविषयी मंत्रीमंडळात देखील चर्चा करण्यात आली, त्यामुळे दर आठवड्याला निर्बंधामध्ये शिथिलता पाहायला मिळेल असं टोपे यांनी नमूद केलं.

मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत तिसरी लाट संपुष्टात येईल असं तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवरून वाटत असल्याचं टोपे यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच लोकसंख्या जास्त असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात लसीचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी केंद्र सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याचंही टोपे म्हणाले.

दरम्यान आगामी काळात सामाजिक दायित्त्व निधीतून राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारच्या फिरत्या दवाखान्यांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून या माध्यमातून ग्रामीण भागात मोफत आरोग्य तपासण्या,उपचार आणि इतर सुविधा पुरवण्यात येणार आहेत.