आपल्या बापाचा घाम कुणी तुडवत असेल तर त्याला सोडू नका – इंगळे 

तुळजापूर – शेतकऱ्यांनो झेंडा कुण्याही पक्षाचा घ्या, पण दांडा शेतकऱ्यांचाच असावा असे आवाहन करीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना शासनाला भिडणारच असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे (Ravindra Ingle) यांनी केले आहे. 2022मध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकविमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम तात्काळ द्या, यासह पुरेशा दाबाने वीज पुरवठा करा, नियमीत कर्ज भरणा-यांना पन्नास हजार तात्काळ द्या, यासह अनेक मागण्यांसाठी मंगळवार दि. २७ डिसेंबर रोजी बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

नाताळ सुट्या व मंगळवार असल्याने तिर्थक्षेञ वाहने मोठ्या प्रमाणात आली होती. त्यातच जुन्या बसस्थानकासमोरील चौकात रस्ता रोको आंदोलन केल्याने चार महामार्गांवरुन जाणारी वाहतूक रोखुन वाहनांचा लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी तहसिलदार सौदागर तांदळे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन रस्ता रोको स्थळी दिले.

यावेळी बोलताना इंगळे म्हणाले, आपल्या बापाचा घाम कुणी तुडवत असेल तर त्याला सोडू नका. पिकविमा आणला म्हणून बोर्ड लावता तसाच कारखाने सुतगिरण्या सहकार संस्था बंद पडल्याचेही बोर्ड लावा असे यावेळी सत्ताधारींना आवाहन केले. माझावर शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाबाबतीत चाळीस केसेस केल्या आहेत. तरीही मी घाबरत नाही. शेवटच्या श्वासापर्यत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतीत शाषणाला लढणारच असे यावेळी जाहीर केले. तुळजापूरात आंदोलन का करता असे आम्हाला पोलिस विचारतात. अरे तुळजाभवानी शेतकऱ्यांची कुलदैवता आहे, त्यामुळे ती शासनाला बुद्धी घालेल, म्हणून देवी दारी नतमस्तक होवून आम्ही शेतकरी आंदोलन करतो, असे ते यावेळी म्हणाले. पिकविमा नुकसान भरपाई अनुदान अखंडीतवीज पुरवठा न केल्यास पुनश्च यापेक्षा तीव्र आंदोलन करु व होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार राहील असेही त्यांनी म्हटले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे, उपाध्यक्ष धनाजी पेंदे, तालुकाध्यक्ष दुर्वास भोजणे, नेताजी जगदाळे, उत्तम अमृतराव, सतिश डोके, नरसिंग पाटील, डाँ अनिल धनके, प्रदीप भोजणे, प्रदीप जगदाळे, चंद्रकांत नरोळे, सुशांत गाडे यांसह हजारो शेतकरी यात सहभागी झाले होते.