धनुष्यबाण कुणाचा? निवडणूक आयोगातील निर्णय लांबणीवर; पुढे काय होणार जाणून घ्या

नवी दिल्ली – शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर शिंदे गटाने (Shide Group) आपणच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचा दावा करत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर हक्क सांगितला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना धनुष्यबाणाचा वाद निवडणूक आयोगासमोर आला आहे. त्यातच मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग धनुष्यबाणावर आजच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र निवडणूक आयोगासमोरील धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय हा लांबणीवर पडला आहे.

दरम्यान, या पेचात कोणते पर्याय वापरले जाऊ शकतात याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. जाणकार लोकांच्या मते आता शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून अंधेरी पोट निवडणुकीसाठी (Andheri East Bypoll Election) उमेदवारी जाहीर करणार असतील तर निवडणूक आयोगाला धनुष्यबाण हे चिन्ह गोठवावं लागेल. जर शिवसेनेच्या एका गटानेच उमेदवार उभा केला आणि दुसऱ्या गटाने उमेदवार उभा केला नसेल तर निवडणूक आयोग अशा स्थितीत जो उभा आहे, त्याला तात्पुरतं बहाल करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या कोणत्याही निर्णयाला आक्षेप असेल तर त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. त्यामुळे एकंदरीत हे प्रकरण आणखी किचकट बनत असल्याचे दिसत आहे.