मुख्यमंत्री माझ्या पक्षात येत असतील तर मला आनंद होईल – रामदास आठवले

नवी दिल्ली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात नवी सरकार उदयास आले आहे. शिंदे यांच्या गटाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. नव्या सरकारला राजकीय संघार्षासोबत कायदेशीर सुद्धा संघर्ष करावा लागत आहे. हा संघर्ष सोपा करण्यासाठी शिंदे यांच्या गटापुढे कोणत्यातरी पक्षात विलीन होणं हा एक पर्याय आहे. त्यामुळे शिंदे गट भाजपात विलीन होणार की आणखी कोणत्या पक्षात जाणार? अशा विविध चर्चांना उधाण आलं आहे.

या दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला आपल्या पक्षात विलीन होण्याची खुली ऑफर दिली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचा गट आपल्या पक्षात आला तर मी टेबलवर उभं राहून त्यांचं स्वागत करेन, अशी मिश्किल प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात आरपीआयला एक मंत्रीपद देण्यात येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

मुख्यमंत्री माझ्या पक्षात येत असतील तर मला आनंद होईल. शिवसैनिक माझ्या पक्षात आले तर टेबलवर उभं राहून मी त्यांचं स्वागत करेन. पण शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळेल. खरी शिवसेना शिंदेंची आहे, बरी शिवसेना ठाकरेंची आहे , असं रामदास आठवले म्हणाले.