‘माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात’

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) भाषणात मुलाचा उल्लेख केल्याने ते टीकेचे धनी बनले आहेत. अनेकांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे दुखावले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपला संताप आणि भावना व्यक्त केल्या आहेत.

“ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहाते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही?,” अशी विचारणा श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. फेसबुकला त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे.

दुसऱ्या बाजूला आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा ठाकरे यांच्यावर मार्मिक टीका केली आहे. “शिवसैनिक सोडून स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिक सोडून स्वतःकडेच पक्षाध्यक्षपद, शिवसैनिक सोडून मुलासाठी मंत्रिपद, एखादी महिला शिवसैनिक सोडून घरातच संपादकपद, पदे वाटताना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात.. महाराष्ट्राचे राजकारण इतक्या खालच्या स्तरावर कधीचं गेले नव्हते.. ज्यांनी नेले त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे,” असं वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटले आहे.