धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर; जाणून घ्या ऑपरेशननंतर तो मैदानात कधी परतणार

MSD : चेन्नई सुपर किंग्ज इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमात चॅम्पियन बनला आहे. मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) फिटनेस चाहत्यांसाठी चिंतेचा विषय आहे. मात्र, अंतिम फेरीनंतर तीन दिवसांनी धोनी आणि सीएसकेच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. धोनीच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, माहीही लवकरच मैदानात परतू शकतो. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, धोनीला मैदानात परतण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही.

धोनीचे फिटनेस अपडेट सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी जारी केले. यात ते म्हणतात, धोनीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. धोनीला गुरुवारी संध्याकाळीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दोन महिन्यांत धोनी पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर पुन्हा मैदानात उतरू शकतो.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमात धोनीला गुडघेदुखीचा सामना करावा लागला होता . गुडघेदुखी असूनही धोनीने सर्व सामने खेळले आणि संघासाठी यष्टिरक्षणाव्यतिरिक्त बॅटने महत्त्वाचे योगदान दिले. धोनीला धावा घेतानाही संघर्ष करावा लागला. धोनी दुखत असतानाही खेळला तरी भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा मोठा चॅम्पियन का नाही हे त्याने दाखवून दिले.