जाणून घ्या देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री का केलं ? 

मुंबई – महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा काल शपथविधी झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना राजभवनामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

दरम्यान,  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) शपथ घेणार, हाच मुळात आज पहिला धक्का राज्यासाठी अन् देशासाठी होता. पण थोड्यात वेळात शिंदेंना मुख्यमंत्री बनवून सरकारच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आले असलेल्या फडणवीसांनी (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, हा सर्वात मोठा धक्का होता.

बंडखोर शिंदेंना मुख्यमंत्री बनवून २०१९ मध्ये आपण उद्धव ठाकरेंनाही (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री बनवू शकलो असतो, असाच संदेश देत ठाकरेंना डिवचले असल्याचे बोलले जात आहे. तर फडणवीस यांचा दिल्लीतील वरिष्ठांनी पंख छाटले असं देखील काहीजण सांगत आहेत. दुसरीकडे एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, असं ट्वीट करून फडणवीस यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (BJP president JP Nadda) यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून त्यांचा त्याग आणि निष्ठा दिसून येते असं अमित शाह (Amit Shah) म्हणाले.

या सर्व घडामोडींमुळे शिंदे यांना फडणवीस यांनी मुख्यमंत्री का केले असा सावळ अनेकांच्या मनात आहे. प्राथमिक दृष्ट्या एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उरलीसुरली जी शिवसेना आहे. तीसुद्धा आपल्या बाजूने खेचून घेण्याचा विचार फडणवीस यांच्या डोक्यात सुरू असू शकेल. जेणेकरून ज्या शिवसेनेने धोका दिला, तिला धडा शिकवणं हा एक उद्देश असू शकतो. दुसरा उद्देश म्हणजे, प्रादेशिक पक्षांना संपवण्याच्या राजकारणाचा तो भाग असू शकतो असं जाणकार सांगतात.

देवेंद्र फडणवीस गेल्या काही वर्षांपासून मराठा लॉबीचं राजकारण करत आहेत. त्याचाही हा एक भाग असू शकतो असं देखील काहींचे म्हणणे आहे. याशिवाय भाजपला आगामी मोठ्या निवडणुकांमध्ये भाजपला (BJP) मोठे यश मिळवायचे आहे ही तयारी करण्यासाठी वेळ मिळावा आणि पुढील पाच वर्षे आरामात सत्ता मिळवता येईल अशी देखील रणनीती असू शकते.